केज तालुक्याला क्रीडा क्षेत्रात नवसंजीवनी मिळवून देणारे कुशल व्यक्तीमत्व : प्रा विनोद गुंड पाटील
उत्तम प्रशिक्षक लाभल्याने विद्यार्थी व क्रीडापटू यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी
5 नोव्हेंबर 2025 वाढदिवस विशेष व्यक्तीमत्व संपादकीय लेख
क्रीडा ही फक्त स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे, हे स्वतःच्या कृतीतून, सातत्यातून आणि सकारात्मक दृष्टीकोनातून सिद्ध करून दाखवणारे नाव म्हणजे प्रा विनोद चंद्रकांत गुंड पाटील. विजय स्पोर्ट्स अकादमीचे संस्थापक व संचालक, केज तालुका क्रीडा संयोजक, तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक या अनेक भूमिकांतून त्यांनी केज तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला दिशा आणि गती दिली आहे.
विद्यार्थी दशेतच क्रीडाप्रेम जोपासले
चंपावती विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेताना क्रीडा प्रेमाची बीजे रुजली. बलभीम महाविद्यालय, बीड येथून पदवी आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमए, एमपीएड पूर्ण करत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील शैक्षणिक भक्कम पाया रचला.
फुटबॉल, क्रिकेट आणि बास्केटबॉल या तीनही खेळांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फुटबॉलमध्ये राज्य सराव शिबिरात सहभाग, जिल्ह्याचे प्रतिनिधित्व आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा मान मिळवला. बास्केटबॉलमध्ये तर त्यांनी बीड जिल्हा संघाचे नेतृत्व करत महाराष्ट्र राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
क्रीडा क्षेत्रातील सेवा गाथा
क्रीडा संयोजक म्हणून तालुक्यातील क्रीडा संस्कृती बळकट करण्याचे ध्येय त्यांनी हृदयाशी बाळगले. तालुक्यात मूळभूत क्रीडा सुविधा नसतानाही हार न मानता त्यांनी विजय स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन केली. ही अकॅडमी आज अनेक विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवणारे ‘क्रीडा गुरुकुल’ बनली आहे.
महत्त्वपूर्ण उपक्रम
प्रशिक्षण शिबिर : योगा, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो, बास्केटबॉल यांसारख्या विविध खेळांचे नियमित प्रशिक्षण
स्पर्धांचे आयोजन : क्रिकेट, बुद्धिबळ, तायक्वांदो, खो-खो इत्यादींचे प्रतिवर्षी भव्य आयोजन
प्रेरणादायी मार्गदर्शन : शालेय, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध
विनोद गुंड यांना प्रा सुनील धांडे, प्रा जे पी शेळके, अनिल जगताप, उत्तम चक्रे, अशोक आघाव व प्रा जमीर सर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. बीड जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर व श्री चव्हाण यांनी वेळोवेळी साथ दिली.
सन्मान आणि गौरव
२९ ऑगस्ट २०२५ – राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी बीडचे जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सह्याद्री भुषण क्रीडा पुरस्कार – 2025 चा विशेष पुरस्काराने सन्मानित आणि बीड जिल्हा खासदार श्री बजरंगबप्पा सोनवणे व आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्तेही उत्कृष्ट क्रीडा संघटक व प्रशिक्षक म्हणून त्यांचा सत्कार झाला—हा क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरवच.
भविष्यातील ध्येय
“केज तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य प्रशिक्षण, संधी आणि व्यासपीठ मिळाले पाहिजे. शालेय ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना घडवणे हे माझे ध्येय आहे,” अशी भूमिका प्रा. विनोद गुंड पाटील व्यक्त करतात.
केज तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा मार्फत शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीयतेची भावना निर्माण करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. समाजासाठी क्रीडा क्षेत्रातले त्यांचे योगदान म्हणजे एक प्रेरणादायी आदर्श आहे.
आज वाढदिवसानिमित्त विजय स्पोर्ट्स अकादमी परिवारासह क्रीडा विश्वातील असंख्य खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी त्यांच्या कार्याचा गौरव करत आहेत.
प्रा विनोद गुंड पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – पुढील प्रवास अधिक यशस्वी, प्रेरणादायी आणि उज्वल होवो!



