महाराष्ट्र

कारगिल युद्धातील थरारक अनुभव ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले

जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेकडून कारगिलच्या अमर वीरांना कृतज्ञ अभिवादन ; देशभक्तीने भारावले वातावरण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

देशासाठी जगणे आणि आवश्यक असेल तर देशासाठी हसत-हसत बलिदान देणे, हीच भारतीय सैनिकांची खरी ओळख आहे, या भावनेचा प्रत्यय देणारा २७ वा कारगिल विजय दिन अंबाजोगाई येथील जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

यावेळी कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शहीद वीर जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करीत त्यांच्या शौर्यगाथांना उजाळा देण्यात आला. संस्थेच्या परिसरातील नियोजित स्मारक स्तंभावर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप यांच्या हस्ते लष्करी शिस्तीनुसार रीतसर शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी भारतमातेच्या वीर सपूतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन पांडुरंग शेप होते. तर यावेळी संस्थेचे पदाधिकारी माजी सुभेदार आबासाहेब हाके, बाबासाहेब केंद्रे, भरत पांचाळ, अरविंद तपसे, श्रीमती महानंदा पोखरकर, श्रीमती सिंधु निर्मळ, यशवंत व्हावळे, सर्जेराव शिरसाठ, श्री.पवार, दत्ता साळुंके, भगवान कांबळे, श्री.रत्नपारखी, श्री.गौरशेटे, सूर्यकांत मुंडे, महेश सोळुंके, विजयकुमार तपसे, माणिक काजगुंडे, सुधीर धायगुडे, हमीद भाई, महादेव पतंगे, आकाश जाधव, गोपीनाथ काळे, श्री.कुंडगर, सय्यद ख्वाजा, श्री.थोरात, अंकुश काळे, श्री.लाखे, अनिरूद्ध डाके, भागुजी दोडे, श्री.भोसले, अभिमन्यू लोखंडे, वसंत सावंत तसेच संस्थेतील आजी-माजी सैनिक, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी कथन केलेले अनुभव. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये उणे तापमानात दिवस-रात्र शत्रूशी दिलेला सामना, सहकाऱ्यांचे बलिदान, रणभूमीवरील संकटांचा सामना आणि विजयासाठी केलेला संघर्ष यांचे त्यांनी अत्यंत जिवंत वर्णन केले. प्रत्येक प्रसंग ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर संपूर्ण परिसरात देशभक्तीचा आणि सैनिकांविषयी अभिमानाचा भाव दाटून आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सुभेदार आबासाहेब हाके यांनी कारगिल युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, युद्धातील महत्त्वाच्या मोहिमा, भारतीय सैन्याचे शौर्य आणि विजयामागील त्याग याविषयी सविस्तर माहिती दिली. कारगिल विजय हा केवळ लष्करी यश नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य जिद्दी, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानाचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे सुभेदार हाके यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप म्हणाले की, कारगिल युद्ध हे भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले पर्व आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी अद्वितीय धैर्य, पराक्रम आणि शौर्य दाखवत शत्रूला पराभूत केले. कारगिल विजय दिन हा केवळ विजयाचा उत्सव नसून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमर वीरांना कृतज्ञतेने स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे असे कॅप्टन शेप यांनी सांगितले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी झाला. उपस्थित सर्वांनी शहीद जवानांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या शौर्यगाथा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रेरक संकल्प केला. बाबासाहेब केंद्रे यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, आजी, माजी सैनिक, युवक, युवती, महिला भगिनी, सैनिक परिवार व शहरातील नागरिकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.