आपला जिल्हासहकार विशेषसामाजिक

आधार मल्टीस्टेट तर्फे राजर्षी शाहू गौरव पुरस्कार, गुणवंतांचा गुणगौरव व अंतर्मनाशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

अध्यक्ष ऍड.सुनिल सौंदरमल यांची माहिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अल्पावधीत नांवारूपास आलेल्या आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,अंबाजोगाई यांच्या वतीने वर्धापन दिन, सामाजिक न्याय दिन, गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त राजर्षी शाहू गौरव पुरस्कार – २०२६ पुरस्कार वितरण सोहळा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे समुपदेशक व प्रेरणादायी वक्ते नवनाथ गायकवाड यांचा अंतर्मनाशी सुसंवाद हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती अध्यक्ष ऍड.सुनिल सौंदरमल यांनी दिली आहे.

 

हा कार्यक्रम शुक्रवार, दि.२६ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार – २०२६ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सत्कारमूर्ती मध्ये ऍड.पंडितराव दौंड (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना जीवनगौरव पुरस्कार, अश्विनी सोनवणे – जिरंगे (अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई) यांना उत्कृष्ट प्रशासक अधिकारी पुरस्कार, गणपत बळवंत व्यास गुरूजी (उपाध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई) यांना साहित्य भूषण पुरस्कार, डॉ.शाहिद शेख (प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ, अंबाजोगाई) यांना विद्या भूषण पुरस्कार, रामस्वरूप खंडेलवाल (रामेश्वरी वस्त्र भांडार, माजलगाव) यांना उद्योग भूषण पुरस्कार आणि डॉ.परमेश्वर सावरगावकर व डॉ.संघमित्रा सावरगावकर (आकांक्षा हॉस्पिटल, परभणी) यांना समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कमलाकर कांबळे भूषविणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय मुंदडा (अध्यक्ष, पन्नगेश्वर सहकारी साखर कारखाना, लि.पानगाव), राजकिशोर मोदी (अध्यक्ष, अंबाजोगाई पिपल्स को-ऑप.बँक लि.अंबाजोगाई), अमर हबीब (ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते, महाराष्ट्र), ऍड.अजय बुरांडे (राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा) तसेच सौ.रोहिणी पाठक (अध्यक्ष, रोटरी क्लब, अंबाजोगाई) यांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी नवनाथ गायकवाड यांचा संमोहन प्रात्यक्षिकांसह निखळ मनोरंजनाचा विशेष अंतर्मनाशी सुसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.‌ यातून सदरील विषयावरील प्रात्यक्षिक व प्रेरणादायी मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. नवनाथ गायकवाड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संमोहन तज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते आहेत. अंतर्मनाशी सुसंवाद साधून अंतर्मनाचे सामर्थ्य उपस्थितांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमातून आपणांस आत्मविश्वास कसा वाढवावा, लक्ष्य कसे निश्चित करावे, मन शांत व एकाग्र कसे करावे, यश-आरोग्य व आनंद कसा मिळवावा, प्रेरणादायी संवाद साधून व्यक्तीमत्व विकास कसा करावा याबाबत मौलिक विचार, मार्गदर्शन व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव तसेच सर्व जेष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आधार मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ऍड.सुनील सौंदरमल, ज्येष्ठ संचालक प्रा.डी.जी.धाकडे, मार्गदर्शक डॉ.कमलाकर कांबळे स्थानिक अध्यक्ष ऍड.किशोर गिरवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत, शाखा अधिकारी गोविंद आकुसकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.