न्यू व्हिजन पब्लिक स्कूल येथे नवीन शैक्षणिक सत्राची उत्साहात सुरूवात
नवीन पुस्तके आणि गणवेशामुळे विद्यार्थ्यांत उत्साह संचारला

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सिबीएसई) संलग्न श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा पहिला दिवस आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. एप्रिल सत्राच्या सुरूवातीला शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार पुन्हा एकदा फुलून गेले आहे.

टॉड्लर्स व्हिले पूर्व-प्राथमिक शाळा, मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड, अंबाजोगाई या ठिकाणी सुट्ट्यांनंतर बालवाडी विभाग मोठ्या आनंदाने पुन्हा सुरू झाला. चिमुकले विद्यार्थी चेहऱ्यावर हास्य घेऊन शाळेत परतल्यामुळे, शाळेचे वातावरण उत्साह आणि आनंदाने भरलेले होते. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी आणि सौ.डिंपल संकेत मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, प्राचार्य डी.एच.थोरात, प्रा.एस.ए.बिराजदार आणि प्रा.राघवेंद्र राजमान्य यांच्या मार्गदर्शनानुसार हा दिवस विशेष आणि स्वागतार्ह बनविण्यासाठी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता सुंदर आणि कल्पक कटआउट्स (आकर्षक आकृत्या) तयार केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला या रंगीबेरंगी आणि आकर्षक कटआउट्स सोबत सेल्फी काढण्याची संधी देण्यात आली. तसेच प्राचार्य, मान्यवर आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत केले. ज्यामुळे हा अनुभव सर्वांसाठीच आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील पहिल्याच दिवशी सहज, आनंदी आणि शाळेच्या वातावरणात एकरूप झाल्यासारखे वाटण्यास मदत झाली. तसेच, एका आनंदी आणि उत्साही वातावरणात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात सुसंवाद साधण्यासही यामुळे प्रोत्साहन मिळाले. एकंदरीत, शाळेच्या पुनर्उद्घाटन दिनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि यासह नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात सकारात्मक व चैतन्यमय वातावरणात झाली. या कार्यक्रमाची सुरूवात शाळेचे प्राचार्य, अकॅडमिक संचालक आणि समन्वयक यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने सरस्वती पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि जुन्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य पांडुरंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच चारित्र्याच्या विकासाला महत्व दिले पाहिजे असे सांगितले. तर अकॅडमिक संचालक विनायक मुंजे यांनी विद्यार्थ्यांना नवीन सत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली व आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करून त्यांना शाळेच्या नियमांची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद आणि नवचैतन्य पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन अविनाश काटकर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय केतेश्वरण तसेच शिक्षकांचा परिचय प्रवीण कुमार यांनी करून दिला. या कार्यक्रमात संगीत विभागाचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

*प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने बहरू शकेल असे वातावरण :*
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. इयत्ता १ ली ते १२ वी तसेच टॉड्लर्स व्हिले पूर्व-प्राथमिक शाळेमध्ये आमच्या सर्व नवीन आणि पुन्हा दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या कुटुंबांचे आम्ही मनापासून स्वागत करतो..! न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, टॉड्लर्स व्हिले पूर्व-प्राथमिक शाळेमध्ये आम्ही एक सुरक्षित, प्रेमळ आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत. जिथे प्रत्येक मूल आपल्या स्वतःच्या गतीने बहरू शकेल. आपल्या मुलाच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर सोपवून, आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. प्रगतीने भरलेल्या एका शानदार वर्षाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
*~ संकेत मोदी*
(कार्यकारी संचालक, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई.)


