केज मतदार संघाच्या माजी आमदार शिवसेना उपनेत्या प्रा. सौ संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी केज शहरासाठी दिलेला शब्द पूर्ण केला. केज नगरपंचायतीसाठी २ कोटींचा निधी मंजूर; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा
माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय शिरसाट व मनोजभाऊ शिंदे यांचे मानले आभार
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज (प्रतिनिधी):
केज शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अनुज्ञेय विकास कामे करण्यासाठी नगरविकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांचा (रक्कम रु. २,००,००,०००/-) निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील नगरविकास विभागाचा शासन निर्णय ४ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
केज मतदारसंघातील शिवप्रेमींची आणि नागरिकांची माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास व सुशोभीकरण व्हावे, अशी प्रमुख मागणी होती. शिवप्रेमींच्या या भावनेचा आणि मागणीचा आदर करत, शिवसेनेत प्रवेश करताना माजी आमदार संगीताताई यांनी हा विषय केंद्रस्थानी ठेवून निधी मिळण्याची प्रमुख अट मांडली होती. केज येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात राज्यचे सामाजिक न्याय मंत्री नामदार मा. श्री.संजय भाऊ शिरसाट आणि संपर्कप्रमुख मनोजभाऊ शिंदे यांनी केजच्या जनतेला व शिवप्रेमींना या कामाबाबत शब्द दिला होता, तो शब्द अखेर पूर्ण झाला आहे.
शिवप्रेमींची ही जुनी मागणी मार्गी लावल्याबद्दल आणि केजच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे साहेब, मा. ना.श्री.संजय भाऊ शिरसाट आणि संपर्कप्रमुख मा. श्री.मनोजभाऊ शिंदे,शिवसेना मराठवाडा सचिव मा. श्री. अशोक भाऊ पटवर्धन,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. सचिन भाऊ मुळूक यांचे मनापासून आभार मानले आहेत.
शासकीय निर्णयातील प्रमुख बाबी:
मंजूर निधी: वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत केज नगरपंचायतीसाठी एकूण २ कोटी रुपयांची तरतूद.
प्रकल्पाचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अनुज्ञेय विकास कामे करणे.
कार्यान्वयन यंत्रणा: सदर विकास कामांची अंमलबजावणी केज नगरपंचायतीमार्फत केली जाईल.
१००% राज्य शासन हिस्सा: या प्रकल्पाचा पूर्ण १००% खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे.
या निधीमुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सौंदर्य वाढणार असून केज शहरातील नागरिकांना उत्तम व सर्वसमावेशक नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवप्रेमींची प्रमुख मागणी पूर्ण झाल्याने केज मतदारसंघ, शहर व परिसरातील शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
