आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणकृषी विशेषपर्यावरण विशेषवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

केज येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’ ने वेधले सर्वांचे लक्ष

सर्वांनी वृक्ष लागवड करण्याचा दिंडीतून संदेश

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी…

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष.

केज, दि. २ : पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन नाणीजधामकडे निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ ने केज येथे सर्वांचे लक्ष वेधले. मराठवाडा (परभणी) उपपीठातून हजारो भाविकांच्या सहभागाने निघालेली ही दिंडी केजमध्ये दाखल होताच नागरिकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिस्तबद्ध रांगेत, टाळ-मृदंगाच्या गजरात मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

यावेळी केज येथे अंबाजोगाईचे नगराध्यक्ष श्री. नंदकिशोरजी मुंदडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी जगद्गुरु श्रीमत् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने या दिंडीचे प्रस्थान श्रीक्षेत्र परभणी येथील रामानंद संप्रदायाच्या मराठवाडा उपपीठातून झाले होते. परभणीपासून श्रीक्षेत्र नाणीजधाम, जि. रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास भाविक पायी करणार आहेत.

दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी नरेंद्राचार्य महाराजांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त नाणीजधाम येथे या दिंडीचा समारोप होणार आहे. परभणीसह तेलंगणा, पूर्व विदर्भ (नागपूर), उत्तर महाराष्ट्र (नाशिक), मुंबई (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) आणि गोवा अशा सात उपपीठांतून दिंड्या नाणीजधामकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृतीसोबतच पर्यावरणपूरक आचरणाचा आदर्श ठेवण्यात येत आहे. मार्गावर कचरा राहू नये यासाठी विशेष स्वच्छता पथक, टॉयलेट व्हॅन, पाण्याचे टँकर, दररोज वृक्षारोपण, वैद्यकीय पथक आणि क्यूआर कोड आधारित उपस्थिती प्रणाली यांची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी केज शहरात दिंडी आली असता बीड जिल्हा सेवा समितीच्या वतीने भव्य दिव्य दिंडीचे स्वागत करण्यात आले .

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.