भारतीय रग्बी संघातील बीडच्या तीन कन्यांचा भव्य सत्कार
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड (प्रतिनिधी) 24 सप्टेंबर निश्चलपुरी गोसावी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने अंडर-18 भारतीय रग्बी संघाचे प्रतिनिधित्व करत चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत सहभागी होऊन बीड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या कु. किर्ती किरण जाधव, कु. अदिती सखाराम लोंढे आणि कु. दीपाली दिलीप ताठे या तीन आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडूंचा मोरया क्रीडा मंडळ, बीडच्या मैदानावर भव्य सत्कार करण्यात आला. मोरया क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यास विविध सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी श्री. उमेश जोशी साहेब (देवगिरी प्रांत संयोजक, भटके विमुक्त विकास परिषद), श्री. बालाजी पवार साहेब (बीड जिल्हा संयोजक, भटके विमुक्त विकास परिषद), श्री. राजेंद्र बन साहेब (संस्थापक अध्यक्ष, दशनाम गोसावी समाज परिषद), श्री. ओमप्रकाश गिरी साहेब (राज्य अध्यक्ष, दशनाम गोसावी समाज परिषद), श्री. सिद्धेश्वर गिरी साहेब (जिल्हाध्यक्ष कर्मचारी, दशनाम गोसावी समाज परिषद तथा ग्रामसेवक), श्री. आसाराम गिरी (जिल्हा उपाध्यक्ष, दशनाम गोसावी समाज), श्री. विनोद शिंदे (संपादक, आरोळी वार्ता) आणि श्री. बाजीराव गिरी (जिल्हा उपाध्यक्ष, दशनाम गोसावी समाज) यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचाही विशेष गौरव‘’ या तीनही खेळाडूंना सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या मोरया क्रीडा मंडळाच्या प्रशिक्षकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. श्री. नितीन येळवे सर (संस्थापक अध्यक्ष, मोरया क्रीडा मंडळ तथा राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक), श्री. अशोक चौरे सर (सचिव तथा प्रशिक्षक, मोरया क्रीडा मंडळ, बीड) आणि श्री. शोएब खाटीक सर (कारागृह पोलीस तथा प्रशिक्षक, मोरया क्रीडा मंडळ, बीड) यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बीडच्या कन्यांची आंतरराष्ट्रीय भरारी कु. किर्ती किरण जाधव, कु. अदिती सखाराम लोंढे आणि कु. दीपाली दिलीप ताठे यांनी भारतीय अंडर-18 रग्बी संघाचे प्रतिनिधित्व करत चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूंनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर भारतीय संघापर्यंत मजल मारली. त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यातील रग्बी क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तीनही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बीडच्या मातीतून तयार झालेल्या या तीन कन्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. मोरया क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बीडमध्ये सातत्याने रग्बी प्रशिक्षण दिले जात असून, विविध वयोगटातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी प्रशिक्षक व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. या तीन खेळाडूंच्या यशामुळे बीड जिल्ह्यातील नवोदित रग्बी खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार असून, भविष्यात आणखी खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कु. किर्ती किरण जाधव, कु. अदिती सखाराम लोंढे आणि कु. दीपाली दिलीप ताठे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या यशाने बीडच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यावेळी कार्यक्रमासाठी महादेव नरवडे, प्रकाश शिंदे, किरण जाधव ,विलास चव्हाण, सचिन माने , पुरनदास रोडे, शिवाजी हिंदोळे, अमोल शिंदे , गडदे तात्याराव यांच्यासह यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
