कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
उंच व तिहेरी उडी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आनंदनगर, अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच शहरातील क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्पृहणीय यश संपादन केले आहे.
उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा व संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे. नुकत्याच शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी क्रीडा संकुल, अंबाजोगाई येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील विविध मैदानी खेळात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून उतुंग भरारी घेतली आहे. १७ वर्षे या वयोगटातील शाळेच्या खेळाडूंनी उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, विविध अंतराच्या धावण्याच्या स्पर्धा तसेच हर्डल्स आदी स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व गाजविले. यात अक्षय विलास मुंडे (उंच उडी -प्रथम क्रमांक), पायल विकास आडे (उंच उडी- प्रथम तर १५०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक), यशराज दिलीप पवार (३००० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक), अंजली सुदाम वाघमोडे (४०० मीटर हर्डल्स मध्ये प्रथम तर २०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक), कौशल्या राठोड (तिहेरी उडी-प्रथम क्रमांक), अनिकेत माणिक पवार (४०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक), हर्षवर्धन मन्मथ काळे (४०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक), अनिल रमेश पवार (३००० मीटर धावणे-तृतीय क्रमांक), सोनाली बालासाहेब राठोड (३००० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक), ओमकार दिलीप राठोड (१५०० मीटर धावणे-द्वितीय आणि थाळीफेक मध्ये तृतीय क्रमांक), पायल नवनाथ राठोड (४०० मीटर धावणे-तृतीय क्रमांक) तर ४०० मीटर रिले स्पर्धेत अंजली सुदाम वाघमोडे, लक्ष्मी पंढरीनाथ राठोड, पायल नवनाथ राठोड आणि साक्षी राठोड या चौघींच्या टीमने प्रथम क्रमांक मिळवून संघातील एकोपा व उत्तम समन्वय दाखवून दिला. सोबतच १४ वर्षे या वयोगटात अमित गजानन पवार (उंच उडी-द्वितीय तर २०० मीटर धावणे-तृतीय क्रमांक) मिळवून आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली. संस्थेचे विद्यार्थी यापूर्वी झालेल्या कबड्डी, क्रिकेट व कुस्ती स्पर्धेतूनही झळकले आहेत. १७ वर्षे या वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाने तसेच क्रिकेट संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कुस्ती (ग्रेको रोमन) स्पर्धेत आदित्य दिलीप जाधव व अमन रमजान शेख या दोन विद्यार्थ्यांनी अंबाजोगाई तालुक्याचे प्रतिनिधित्व करून यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामागे क्रीडाशिक्षक प्रविण उत्तमराव ठोंबरे, गणेश राठोड आणि श्रीमती ए.डी.शिंदे यांचे शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तसेच संस्थेचे सचिव अनिल राठोड यांनी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी, सहभागी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देत, पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
*विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या एकजुटीचे फळ :*
कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतली ही उत्कृष्ट कामगिरी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील या मुला-मुलींनी क्रीडाक्षेत्रात दाखविलेला चमकदार डौल कौतुकास्पद आहे. हे यश विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या एकजुटीचे फळ आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना मनापासून अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा.
*~ डि.बी.क्षीरसागर*
(सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बीड.)
—————————————–
*विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि शारीरिक सक्षमता वाढते :*
ग्रामीण भागातील असूनही क्रीडा क्षेत्रात असे वैभव संपादन करणे हे विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सराव, लयीने प्रयत्न आणि शिक्षकांच्या समर्पित मेहनतीचेच फळ आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि शारीरिक सक्षमता वाढते. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी या सर्व खेळाडूंकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना हार्दिक अभिनंदन.
*~ सतीश राठोड*
(तालुका क्रीडा अधिकारी, अंबाजोगाई.)


