अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयास बीड जिल्हा क्रीडा विभागाकडून 83 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान
विशेष सन्मान न्यूज
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयास बीड जिल्हा क्रीडा विभागाकडून सुमारे 83 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले.
सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने जिल्हा तसेच राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले. अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकांसह विविध प्राविण्य पुरस्कार मिळवत महाविद्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महाविद्यालयात क्रीडा विभागामार्फत नियमित सराव व स्पर्धात्मक उपक्रम राबवले जातात. क्रीडा शिक्षक प्रा.माणिक पोखरकर व प्रा.राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येही यश मिळवले आहे. साक्षी थाटकर हिने ॲथलेटिक्स मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच सुमारे 10 ते 11 विविध क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला. बीड जिल्हा क्रीडा विभागाने या कामगिरीची दखल घेत प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केले असून त्याबाबतचे पत्र प्राचार्य डॉ.दीपक फुलारी यांना पाठवण्यात आले आहे. हे अनुदान क्रीडांगणाची देखभाल, दुरूस्ती, क्रीडा साहित्य खरेदी, क्रीडा विषयक पुस्तके व प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे, कार्यवाह किरणदादा कोदरकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, अविनाश तळणीकर आदी मान्यवरांनी क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे.



