सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज — खा.बजरंग सोनवणे यांचे प्रतिपादन
केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

केज, दि. २६ : केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी माळेगाव येथील शाळेला पीएमश्री योजनेत स्थान मिळवून देत ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची जिल्हा परिषद शाळांना नितांत गरज आहे, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.
प्राथमिक शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा साळेगाव जिल्हा परिषद प्रशालेचे केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत तुकाराम काळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त माळेगाव येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सोनवणे यांच्या हस्ते सूर्यकांत काळे व त्यांच्या पत्नी सुरेखा काळे यांचा पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सन्मानपत्राचे लेखन डॉ. संजय शिंदे यांनी केले, तर वाचन अरुण शिंदे यांनी केले. कार्यक्रमास माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगीता ठोबरे, माजी पंचायत समिती सभापती राजेसाहेब देशमुख, अनुराधा नखाते, नगराध्यक्ष सीता बनसोड, हारुण इनामदार, नबाब इमाम, डॉ. देवेंद्र डोके, बालासाहेब जाधव, बाळकृष्ण भवर, सरपंच कैलास पाटील, माजी मुख्याध्यापक पी. के. देशमुख, ‘छावा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक अर्जुन बोराडे यांनी सांगितले की, सूर्यकांत काळे यांनी गेल्या साडेतीन दशकांत जिल्हा परिषद शाळेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. यावर बोलताना खासदार सोनवणे म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून काळे यांना ओळखत असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांची असलेली तळमळ त्यांनी जवळून अनुभवली आहे. ते हरहुन्नरी, धडपड्या व कर्तव्यनिष्ठ शिक्षक आहेत.
गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनीही साळेगाव शाळेला तालुका व जिल्ह्यात आदर्श स्थान मिळवून देण्यात काळे यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना सूर्यकांत काळे म्हणाले की, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच शाळेचा कायापालट शक्य झाला. चारे या छोट्या खेड्यातून अत्यंत कष्ट व जिद्दीच्या जोरावर आपण येथेपर्यंत पोहोचलो, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार व गोविंद मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजाभाऊ ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी मुख्याध्यापक पी. के. देशमुख, संजय चवरे, अक्षय व राजेश काळे यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास शिक्षण, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी राजेसाहेब देशमुख, पृथ्वीराज साठे, सुनील केंद्रे, अंकुशराव इंगळे व शिवाजी ठोंबरे व्यासपीठावर उपस्थित होते.



