अवकाळी पावसाचा तडाखा बाधितांच्या घरी जाऊन श्री राहुल सोनवणे बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांनी दिला धिर
अवकाळी पावसाचा तडाखा: सादोळ्यात 90 एकर केळी बागा भुईसपाट, एक शेतकरी दगावला

कृषी विशेष वै. महाराष्ट्र न्यूज
प्रा. दत्तात्रय जाधव अंबाजोगाई प्रतिनिधी
बीड, दि. 25 मे 2026 :* काल रात्री जिल्ह्यात आलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. विशेषतः सादोळा व सोनीजवळा परिसराला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.
सादोळा येथे केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले
सादोळा शिवारात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 80 ते 90 एकर क्षेत्रावरील निसवणीच्या अवस्थेतील केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून, कष्टाने उभी केलेली बाग एका रात्रीत नष्ट झाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
आज सकाळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. राहुल भैया सोनवणे यांनी सादोळा येथे धाव घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी बाधित शेतकरी श्री. बाळासाहेब मस्के, श्री. अशोक जाधव, श्री. नामदेव घुले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व त्यांना धीर दिला. “हे संकट मोठे आहे, पण तुम्ही एकटे नाही. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,” असे आश्वासन राहुल भैया सोनवणे यांनी यावेळी दिले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष, सरपंच, स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
सोनीजवळा येथे काळाने घातला घाला
या वादळी पावसात सोनीजवळा येथील 48 वर्षीय प्रगतशील शेतकरी श्री. दिगंबर कोंडीराम ससाणे यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. काल सायंकाळी 6:30 च्या सुमारास शेतातून घराकडे परत येत असताना अचानक वीज कडाडली व त्यांच्या अंगावर वीज कोसळून शेजारचे आंब्याचे मोठे झाडही अंगावर पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ससाणे हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.
आज दुपारी मा. राहुल भैया सोनवणे यांनी सोनीजवळा येथे जाऊन ससाणे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. “दिगंबर ससाणे यांच्या जाण्याने कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण काँग्रेस परिवार तुमच्या सोबत आहे. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
शासनाकडे मागणी
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. बाधित केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत व मयत शेतकरी दिगंबर ससाणे यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. राहुल भैया सोनवणे यांनी शासनाकडे केली आहे.



