विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या मागणीला यश
अंशत: अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदान वितरणाचा शासन निर्णय पारित!

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आजी-माजी शिक्षक आमदारासह 8 व 9 जुलै रोजीच्या शाळा बंद आंदोलनाचे हे यश- खंडेराव जगदाळे
बीड दि.१०(प्रतिनिधी)- राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्प्यानुसार वेतनाच्या ऑक्टोबर महिन्याच्या तरतुदीचा अनुदान वितरण आदेश पारित करावा अशी मागणी राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती या मागणीला यश आले आहे. आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी
अंशत: अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदान ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी वितरणाचा शासन आदेशही आज जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व आजी माजी शिक्षक आमदार आणि विविध शिक्षक संघटना यांच्यासह 8 व 9 जुलै 2025 रोजीच्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचे हे यश असल्याचे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. सदर शासन आदेश निर्गमित झाल्याने सध्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळेतील
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर
वाढीव 20 टक्के अनुदाना वितरित करण्यासाठी 25 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय झाला. परंतु ऑगस्ट सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी देखील वाढीव टप्प्याप्रमाणे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वाढीव टप्प्याचे वेतन झाले नाहीत. 20 टक्के वाढीव टप्प्याप्रमाणे निधीची तरतूद व्हावी यासाठी अनेक दिवसापासून आजी व माजी शिक्षक आमदार यांच्यासह शिक्षक संघटना प्रयत्न करीत होत्या. परंतु शासनस्तरावर कोणतीच हालचाल होत नसल्याने शेवटी विनाअनुदानित शाळा कृती समितीने वाढीव टप्पा नुसार निधीची तरतूद करून 20 ऑक्टोबर 2025 पूर्वी
वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा व्हावे
न झाल्यास 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी दिवशीच राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्या दारात काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देत आंदोलनाचे हत्यार उपसले. विना अनुदानित शाळा कृती समितीच्या या इशारा आंदोलनाची शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने दाखल घेत
प्रत्यक्षात टप्पा वाढ निधी वितरणाच्या कामाला सुरुवात केली. सोमवार दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी अंशत: अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी
निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी वितरणाचा शासन आदेश आज सोमवार रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. येत्या दोन-चार दिवसात दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने ऑक्टोबर पेड इन ऑक्टोबर असे वाढीव टप्पा अनुदाना प्रमाणे होणारे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे. या कामी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह राज्यातील इतर आजी माजी शिक्षक आमदार आणि विविध शिक्षक संघटनांचे प्रयत्न कामी आले असल्याचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. सध्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________________



