आपला जिल्हादेश विदेशवैभवशाली महाराष्ट्र न्युज

भारत–उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटात खासदार बजरंग सोनवणे यांची निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

नवी दिल्ली: लोकसभा सचिवालयाच्या वतीने भारत–उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाची (India–Uzbekistan Parliamentary Friendship Group) १८व्या लोकसभेसाठी स्थापना करण्यात आली असून या गटात बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

लोकसभा सचिवालयाच्या परिषद व प्रोटोकॉल शाखेकडून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष यांच्या मान्यतेने खासदार बजरंग सोनवणे यांची भारत–उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाच्या सदस्यपदी नामनिर्देशित करण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील संसदीय सहकार्य वाढविणे, परस्पर संबंध अधिक दृढ करणे तसेच सांस्कृतिक, आर्थिक व राजनैतिक देवाणघेवाण मजबूत करणे या उद्देशाने संसदीय मैत्री गट कार्यरत असतात. या माध्यमातून दोन्ही देशांतील संसदीय प्रतिनिधींमध्ये संवाद आणि सहकार्य वाढण्यास मदत होते.

 

खासदार बजरंग सोनवणे यांची या महत्त्वपूर्ण गटावर निवड झाल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक प्रश्न मांडण्याची तसेच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

दरम्यान, भारत–उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांतून खासदार सोनवणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.