नवजीवन संगोपन केंद्रात अन्नदान करत कु.वर्षा लोकेश काबरा हिचा वाढदिवस साजरा
गरजू, अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी, भटके-विमुक्त तसेच वंचित घटकांतील मुलांना अन्नदान

आष्टी/पाटोदा/शिरुर ता. प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी, भटके-विमुक्त तसेच वंचित घटकांतील मुलांचा मोफत सांभाळ करून त्यांना शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, या केंद्राला शासनाकडून कोणतेही अनुदान किंवा मदत मिळत नसून, समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानेच हे कार्य सुरू आहे.
या केंद्रातील मुलांना मदतीचा हात मिळावा आणि “समाजाचे काही देणे लागतो” या उदात्त भावनेतून आष्टी येथील महालक्ष्मी स्वीट होम चे मालक लोकेश काबरा यांनी आपल्या मुलगी वर्षा लोकेश काबरा हिचा १२ वा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून साजरा करत, नवजीवन संगोपन केंद्रातील गोरगरीब, अनाथ व निराधार मुलांना एक दिवसाचे अन्नदान दिले.
या सामाजिक उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, काबरा कुटुंबाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा सतत घडत राहो, हीच प्रार्थना व्यक्त करण्यात आली.
लोकेश काबरा हे राजस्थान येथून येऊन आष्टीसारख्या ग्रामीण भागात महालक्ष्मी स्वीट होम या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सर्वसामान्य लोकांची सेवा करत आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमीच आघाडीवर राहून सहकार्य करत असतात.
कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के (मेजर) यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


