शेतकऱ्यांचे बाबासाहेब’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
14 एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक पुरुषोत्तम जाधव लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
माजलगाव, दि. १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे सामाजिक कार्यकर्ते, लेखक पुरुषोत्तम जाधव लिखित ‘शेतकऱ्यांचे बाबासाहेब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सकाळी ११:३० वाजता उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषी-आर्थिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक ग्रामीण महाराष्ट्रात चांगलीच चर्चा निर्माण करत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी गौरवजी इंगोले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बाबुरावजी पोटभरे, प्रा. अर्जुन तनपुरे, तुकाराम येवले, श्रीहरी मोरे, कचरू खळगे, डॉ. श्रीराम खळगे, एड. भानुदास डक, दिलीप धुमाळ, नारायण झोडगे, सदाशिव भालेराव तसेच सदधम्म सेवा संघ व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजाई प्रकाशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. उपस्थित मान्यवरांनी हे पुस्तक ग्रामीण भागातील वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत लेखकाचे अभिनंदन केले. बाबासाहेबांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे कार्य महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
श्रावस्ती बुद्ध विहाराच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल लेखक पुरुषोत्तम जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


